

संजय कुलकर्णी
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या सध्या येथे सुरू असलेल्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील जलयात्रा बुधवारी मोठ्या भक्तीभावात पार पडली. दुपारी मातेची नित्योपचार पूजा उशिराने सुरू होऊन मातेची शेषशाही अलंकार महापूजा बांधण्यात आली.
‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक तुळजाभवानी मंदिरात पोहोचल्यानंतर या जलाने मातेचा गाभारा आणि मातेचे सिंहासन स्वच्छ करण्यात आले. जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरी देवीच्या प्रतिमेची विविध प्रकारचा भाजीपाला (शाक) आणि फळांचा वापर करून केलेली विशेष सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
या भव्य जलयात्रेत महिला भगिनींसोबत गोंधळी, आराधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात जलकुंभाची मिरवणूक उत्साह आणि जोशात पार पडली. मिरवणुकीत सहभागी झालेले घोडे आणि बैलगाड्याही लक्ष वेधत होत्या. या सोहळ्यात अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष विनोद गंगणे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, उपाध्ये सुनील(बंडू) पाठक, शाकंभरी नवरात्र उत्सवातील यंदाचे यजमान सौ.व श्री उल्हास कागदे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे, जयसिंग पाटील, महेंद्र आदमाने, तीनही पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनुक्रमे अमर कदम (परमेश्वर), विपिन शिंदे, अनंत कोंडो, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यात्रेतील सहभागी महिला, भाविकांना प्रक्षाळ मंडळाच्यावतीने भाजी मार्केट परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. या धार्मिक कार्यक्रमांना महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील हजारो भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.