

तुळजापूर : तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने दुपारी १२ वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली. यानंतर पुढील सात दिवस नवरात्राचे धार्मिक विधी परंपरागत पद्धतीने संपन्न होतील.
या प्रसंगी तहसीलदार सौ .माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमराराजे कदम, उपाध्ये पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले, बाळासाहेब शामराज, मकरंद प्रयाग, श्रीराम अपशिंगेकर, सुनील लसणे, इंद्रजीत साळुंखे यांच्यासह इतर पुजारी मानकरी सेवेकरी उपस्थित होते. विधिवत पद्धतीने गटाची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दुपारी बारा वाजता घटस्थापनेचा विधी पार पडला.
तत्पूर्वी गेल्या ७ दिवसांपासून सुरू असलेली देवींची मंचकी निद्रा संपवून पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवींची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीचे भोपे पुजारी अमरराजे कदम, सचिन परमेश्वर, शशिकांत पाटील, अतुल मलबा, विकास मलबा, शशिकांत परमेश्वर, अजित परमेश्वर यांच्यासह इतर पुजारी बांधवांनी देवीची मूर्ती हातावर उचलून मुख्य सिंहासनावर परंपरागत पद्धतीने विराजमान केली. त्यानंतर देवीला दही दुधाचे अभिषेक घालण्यात आले. मानाच्या आरत्या या निमित्ताने करण्यात आल्या.
धाकटा दसरा म्हणून प्रसिद्ध असणारा देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव या शक्तिपीठाच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये अत्यंत मोलाचा महत्त्वाचा आहे, प्रशासनाकडून यावर्षी करण्यात आलेले नवरात्राचे नियोजन यामुळे सर्व धार्मिक विधी उत्साहात होतील.
अनंतराव कोंडो, अध्यक्ष तु. भ. उपाध्ये पुजारी मंडळ