Solapur Accident | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील ३ बांधकाम कामगारांचा मृत्यू
Bike Accident Solapur Three Killed
सोलापूर: दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना आज (दि.२४) सकाळी ९ च्या सुमारास सोलापुरातील मुस्ती ते वळसंग मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. देविदास दुपारगुडे (वय 40), नितीन वाघमारे (वय 35) आणि हनुमंत राठोड (वय 40, सर्व रा. मुस्ती तांडा) अशी मृतांची नावे आहेत. तिघांच्या दुर्दैवी मृत्यूवर मुस्ती गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तिघे व्यक्ती बांधकाम कामगार असून आज सकाळी 9 च्या सुमारास कामासाठी मुस्ती गावातून वळसंग येथे निघाले होते. यावेळी गावाजवळच असलेल्या तळ्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला आहे.

