

पंढरपूर : उजनी धरणातून 31600 तर वीर धरणामधून 6537 क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीपात्रात एकूण 40 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे 8 बंधारे पाण्याखाली गेलेे आहेत. यामुळे या बंधार्यांवरून होणारी वाहतूक बंद करण्यात यावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून नीरा खोरे व भीमा खोर्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे नीरा नदीपात्रात वीर धरणामधून 6537 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. भीमा नदीपात्रामध्ये उजनी धरणामधून 31600 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. तर नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये 40,000 क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग प्रवाहित होणार आहे. त्यामुळे भीमा नदीवरील सर्व कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भीमा नदीवरील बंधार्यांवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.
आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 6 जुलै रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी माऊली व तुकोबाच्या पालख्यांसह मानाच्या पालख्या राज्यभरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. तर हजारो दिंड्यांचे देखील पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आहे. त्यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागेला पूरपरिस्थिती उद्भवू नये. म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. उजनी धरण 75 टक्के भरले आहे. त्यामुळे जर भविष्यात पाऊस झाला तर पाणी साठवण क्षमता असावी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वारीपूर्वी बर्यापैकी धरणातील पाणी कमी करण्यात येणार आहे. तर वारी काळात पंढरपूर येथे चंद्रभागा नदीपात्रात केवळ दोन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, मान्सूनपूर्व झालेल्या जोरदार पावसामुळे नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे भीमा नदीपात्रातील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मे महिन्याच्या अखेरीसच भरले गेले आहेत. आता यात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बंधारे त्वरित भरुन पाणी पुढे जात आहे. 30 हजार क्युसेक विसर्गाला दगडीपूल पाण्याखाली जातो. तर 40 हजार क्युसेकला कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जातात.
पटवर्धन कुरोली, गुरसाळे, इसबावी, पंढरपूर, गोपाळपूर, मेंढापूर, पोहोरगाव, पुळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.