

माढा तालुक्यातील आकुंभे येथील शेतातील डाळींब बागेतील काढणीस आलेले डाळींब चोरट्यांनी लंपास केले. हा मुद्देमाल तीन लाखा पेक्षा जास्त किमतीचा होता. तसेच याचे वजन नऊ टन होते. ही घटना (दि.4) ऑगष्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
माढा तालुक्यातील आकुंभे शिवारात समाधान दिगंबर कदम (वय.४४) यांची गट नं-१४२/५ मध्ये बागायत शेतजमीन असून त्यांनी शेतात २०१९ मध्ये डाळींब बाग लागवड केली होती. त्यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून उत्पादन सुरू झाले आहे. सध्या डाळींब फळास देशात आणि परदेशात मोठी मागणी असून पिकास दर ही चांगला मिळत असल्याने शेतकरी वर्ग या पिकाकडे वळला आहे. कदम हे 3 ऑगस्ट रोजी रात्री शेतात फेरफटका मारून व बागेतील कामे करून घरी गेले होते. सकाळी ०४ ऑगस्ट रोजी ते परत शेतात गेले तेव्हा त्यांना बागेतील डाळींब पीक चोरी झाल्याचे आढळून आले. या संदर्भात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात समाधान कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे.