

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाला घरघर लागली आहे. माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथील महामार्गलगतच्या संघाच्या नऊ एकर जागेचा अखेर लिलाव झाला. त्या जागेस 16 कोटी 61 लाख रुपये किंमत मिळाली. पंढरपूर पाठोपाठ टेंभूर्णी येथील जिल्हा दूध संघाची जागेची विक्री झाली. यामुळे दूध संघ बंद पडण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
टेंभुर्णी येथील संघाचे दूध संकलन केंद्र व नऊ एकर जागेच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली. एचडीएफसी बँकेने त्यांच्या कर्जाच्या वसुलीसाठी या जागेचा लिलाव केला. राष्ट्रीय महामार्ग लगत बाजार मूल्य असणार्या या जागेला 16 कोटी 61 लाख रुपये किंमत मिळाली. मालमत्ता खरेदी करणार्याने सदर जागेवर इमारती जमीनदोस्त केल्या. विशेष म्हणजे तरीही संघाचे प्रशासन लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अमान्य करत आहे.
कामकाज बंद पडलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाकडील कर्जापोटी एचडीएफसी बँकेने तारण टेंभुर्णी येथील जागा विक्री केली. बँकेची संघाकडे 35 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम आहे. यासाठी बँकेने टेंभुर्णी व मुंबई येथील जागा ताब्यात घेतली आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदीदाराने टेंभुर्णी येथील संघाच्या जागेवर असणार्या संकलन केंद्राच्या इमारती व इतर कार्यालय पूर्णपणे जमीनदोस्त केले. उर्वरित रकमेसाठी मुंबई येथील जागेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, लिलाव प्रक्रिये संदर्भात संघाच्या कार्यकारी संचालकांच्या म्हणण्यानुसार बँकेच्या लिलाव प्रक्रियेच्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत. न्यायालयाने जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे आदेश आल्यानंतरही लिलाव घेणार्या पक्षाने येथील इमारती पाडल्या आहेत. याबाबत न्यायालयाकडे बाजू मांडणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
सोलापूर जिल्हा दूध संघावर जवळपास 60 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी संचालक मंडळाने मालमत्ता विक्री करण्याचा निर्णय घेतला. यानुसार पंढरपूर येथील सात एकर जागा विक्री करण्यात आली. त्यानंतर बँकेने आता टेंभुर्णी येथील जागेची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.