Solapur News: जैविक कचरा विल्हेवाटीत हयगय; ‌‘बायोक्लिन‌’ काळ्या यादीत

सोलापूर महापालिका आयुक्तांची कारवाई; ‌‘पुढारी‌’च्या दणक्याने घ्यावा लागला निर्णय
Solapur News |
Solapur News: जैविक कचरा विल्हेवाटीत हयगय; ‌‘बायोक्लिन‌’ काळ्या यादीतPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : वैद्यकीय कचरा संकलन आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केली. शहरातील विविध हॉस्पिटलमधून संकलित केलेल्या जैविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याचा ठपका सदर कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीचा भोगाव येथे जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. हा प्रकल्प चालवण्यासाठी बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची 2003 मध्ये नियुक्ती झाली होती. प्रकल्प चालक म्हणून वीस वर्षांसाठी करार केला होता. कराराची मुदत डिसेंबर 2023 रोजी संपल्याने रितसर नव्याने निविदा प्रक्रिया काढून एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीची दि. 5 जानेवारी 2024 पासून प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ठरलेल्या कालावधीत शिल्लक राहिलेल्या जैविक वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तसाच ठेवला होता. महापालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार दररोज 40 ते 50 टन जैविक कचऱ्याची (कार्बन 25 टन आणि 15 टन) तत्काळ विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट न लावल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही महापालिकेने दिला होता, तरीही बायोक्लिन कंपनीने कार्यवाही केली नाही. यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे चाळीस लाखांचे आर्थिक नुकसान झाले.

दरम्यान, साठवून ठेवलेल्या जैविक कचऱ्याची सात दिवसांत विल्हेवाट लावावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दि. 25 ऑक्टोबर 2025 रोजी आरोग्य विभागाने कंपनीला दिला होता, तरीदेखील कंपनीने कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त लोकरे यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सदर प्रकल्पास नोटीस देऊन व पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकत कंपनीचा मक्ता संपुष्टात आणला.

दरम्यान, बायोक्लिन कंपनीला महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात बिल अदा करण्यात आली आहेत. आता ते बिल वसूल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दैनिक ‌‘पुढारी‌’ने उठविला होता आवाज

बायोक्लिन कंपनीच्या गैरकारभाराविषयी दैनिक ‌‘पुढारी‌’ने सर्वात प्रथम आवाज उठवला होता. सदरचा मक्ता बेकायदा असून नियुक्ती केलेली कंपनी शहरातील विविध हॉस्पिटलकडून जादा दराने जैविक कचरा संकलन करत असल्याचे जळजळीत वास्तव ‌‘पुढारी‌’ने प्रकाशात आणले होते. भोगाव येथील कचरा डेपोत जैविक कचरा मोठ्या प्रमाणात शिल्लक असून सदरचा कचरा नष्ट न करता बेकायदा परगावी पाठवत असल्याचे धक्कादायक वार्तांकनही ‌‘पुढारी‌’ने केले होते. त्यामुळे कंपनीच्या कृष्णकृत्याची माहिती सर्व सोलापूरकरांना झाली. ‌‘पुढारी‌’च्या या पाठपुराव्याची, परखड पत्रकारितेची दखल घेऊन आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी बायोमेडिकल वेस्टवर छापा घालून तपासणी केली असता जैविक कचरा बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नियमानुसार नष्ट न करता बेकायदा परगावी पाठवत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर कंपनीच्या गैरकारभाराविषयी सोलापूरभर चर्चा झाली. विविध माध्यमांनीही यावर आवाज उठविण्यास प्रारंभ केला; परंतु या घटनेचे सविस्तर, परखड, पारदर्शी, वस्तुनिष्ठ वार्तांकन सर्वात प्रथम ‌‘पुढारी‌’ने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news