

Tembhurni crime news
टेंभुर्णी : एका २६ वर्षीय महिलेला बळजबरीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्यासाठी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी बाह्यवळण रस्ता परिसरात ही अंगावर शहारे आणणारी घटना ११ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडली आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी, सामूहिक लैंगिक अत्याचार व जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह, ‘पिटा’ कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला ही सोलापूर येथील रहिवासी आहे. ती ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते दि. १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान टेंभुर्णी परिसरात आली होती. या वेळी या गुन्ह्यातील संशयित आरोपी शारदा झुरंगे, प्रवीण चव्हाण आणि राखी मल्होत्रा (तृतीयपंथी) यांनी तिला टेंभुर्णी बाह्यवळण रोडच्या बाजूस नेले. तेथे लखन तांदळे व बाळू जाधव हेदेखील आले होते.
सर्व आरोपींनी मिळून पीडित महिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास राजी होत नसल्याने तिला हाताने जबर मारहाण, दमदाटी व शिवीगाळ केली. त्यानंतर संशयित आरोपी बाळू जाधव व प्रवीण चव्हाण यांनी पीडितेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या आडोशाला नेऊन बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. एवढ्यावरच हे अत्याचार थांबले नाहीत, तर अत्याचार केल्यानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जबरदस्तीने काही वस्तू व हात घालून अत्यंत निर्घृणपणे लैंगिक व वेदनादायक कृत्ये केल्याचे गंभीर आरोप पीडितेने फिर्यादीत केले आहेत.
या प्रकरणी पीडित महिलेने गुरूवारी (दि. १३) टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेत पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(L), ७०(१), ११५(२), ३५२, ३५१(२), पिटा अॅक्ट कलम ५, तसेच अॅट्रॉसिटी कायद्याची कलमे ३(१)(w)(i)(ii) व ३(२)(v) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांनी केली असून, घटनेचे गांभीर्य व व्याप्ती पाहता या गुन्ह्याचा अधिक तपास करमाळा विभागाच्या साहाय्यक पोलीस अधीक्षक या स्वतः करत आहेत.