

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील आठ हजार 248 शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून शुक्रवारी (दि.5) टीईटी परीक्षा रद्द करा, नवीन संच मान्यतेमधील जाचक अटी रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील दोन हजार 159 बंद ठेवण्यात आल्या. या दिवसाचे शिक्षकांचे वेतन कपात केले जाणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाच्या 36 शिक्षक संघटनांनी एकत्रित येत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी शहर-जिल्ह्यातून आठ हजार 248 शिक्षक, 27 शिक्षकेत्तर कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे त्या शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, शिक्षक संघटनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही शिक्षक संघटना या संपात सहभागी झाल्या नव्हत्या. त्यामुळे एक हजार 183 शाळा सुरु असल्याचा दावा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून नेमक्या किती शाळा बंद अन् किती सुरु याची योग्य आकडेवारी कळू शकली नाही.
संपामुळे बंद शाळा 2159
चालू शाळा 1183
जि.प. सहभागी शिक्षक 6821
खासगी सहभागी शिक्षक 1305
महापालिका, नगरपालिका 122
सहभागी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 27
संस्था चालकांनी चालविली शाळा
मार्डी येथील यमाईदेवी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक संपावर गेल्यामुळे शाळा बंद न करता संस्था चालकांनी शाळा चालविली. प्रथम प्रार्थना घेऊन तसेच गर्जा महाराष्ट्र गीत घेऊन शाळा सुरू केली. संपावर शिक्षक असल्यामुळे संपाची प्रतिकृती तयार करून पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष अशोक लांबतुरे, संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा लांबतुरे, सचिव मधुकर गवळी आदी हजर होते.