

अक्कलकोट : अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी, नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता द्या, तीनही शहरांचा चौफेर विकास पाहायला मिळेल, निधीची कमतरता कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट येथील जाहीर सभेत दिले.
रविवारी अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने तीनही नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगरुळे हायस्कूल समोरील प्रांगणात झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, मैंदर्गीचे मठाधिपती नीलकंठ महास्वामी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची प्रमूख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधकावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही सर्वांगीण विकास कशा पध्दतीने करणार आहे, हे सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या माध्यमातून विविध राज्यात योजना राबवित आहे. मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आगामी काळात एक कोटी बहिणींना लखपती दीदी करणार आहे.
2014 ते 2019 या काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी आमदार झाले. तेव्हापासून अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. अक्कलकोट येथील नूतन बस स्थानकासाठी 23 कोटी, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता 369 कोटी निधी मंजूर, सदरील निधीस रिवाईज करून 500 कोटी रुपयांचा निधी तयार होणार आहे.
अमृतजल करिता 75 कोटी, रस्त्या करिता 114 कोटी, ड्रेनेज कामाकरिता 168 कोटी, न्यायालय करिता 60 कोटी, हत्ती तलाव सुशोभीकरण दहा कोटी, विविध मार्गाकरिता 286 कोटी, देगाव एक्स्प्रेस करिता 350 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी अक्कलकोट करिता देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सभेस माजी आमदार राजन पाटील, अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मीलन कल्याणशेट्टी, मैंदर्गीचे उमेदवार अंजली बाजारमठ, दुधनीचे अतुल मेळकुंदे, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, महेश इंगळे, अविनाश मढीखांबे, कांतु धनशेट्टी, तम्मा शेळके, रमेश कापसे, मोतीराम राठोड, उत्तम गायकवाड प्रदीप पाटील, अमोलराजे भोसले, महेश बिराजदार, सभापती अप्पू परमशेट्टी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.