

सांगोला: पुढारी वृत्तसेवा : पोलीस उपनिरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणी संशयित आरोपी सुनील मधुकर केदार व विजय बबन केदार यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर या दोघांना आज (दि. १९) हजर केले होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Solapur murder case)
गुरुवारी ३ ऑगस्टरोजी पहाटे सुरज विष्णू चंदनशिवे (वय ४३, रा. वासुद, ता. सांगोला) केदारवाडी रोडवरील उसाच्या शेतात मृतावस्थेत आढळून आले होते. चंदनशिवे यांचा डोक्यात व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केला होता. घटनास्थळी पोलीस अधीक्षक गिरीश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव विभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी भेट दिली. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून सुनील केदार व विजय केदार यांना ३ ऑगस्टरोजी ताब्यात घेतले होते. (Solapur murder case)
अधिक तपासामध्ये मृत सुरेश चंदनशिवे यांचे गावातील सुरज मधुकर केदार यांच्यासोबत आर्थिक कारणातून वर्षभरापासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. त्याअनुषंगाने सखोल चौकशी केली असता सुनील मधुकर केदार व विजय बबन केदार या दोघांचा या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी (दि.१८) त्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना आज (दि.१९) पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
हेही वाचा