

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाचे हस्तांतरण एनडीडीबी म्हणजेच राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. दुग्धविकासमंत्री अतुल सावे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघ चालू करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीही मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली. त्यामुळे दूध संघ एनडीडीबीकडे हस्तांतर होणार की संचालकांच्या ताब्यात राहणार, याचा निकाल लवकरच लागणार आहे.
कामकाज बंद असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे नियंत्रण राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा संघाच्या संचालक मंडळांनी केला होता. यानंतर एनडीडीबीकडून संघाच्या संपूर्ण यंत्रसामुग्रीची पाहणी करण्यात आली होती. यानंतर मंगळवारी राज्याचे दुग्धविकासमंत्री अतुल सावे यांच्यासमवेत संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, संचालक राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक उत्कर्ष चौरे व एनडीडीबीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संघाच्या एनडीडीबीकडील हस्तांतरणाची चर्चा करण्यात आली.
गेल्या एप्रिल महिन्यापासून सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे संकलन पूर्णपणे बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खाजगी संस्थांकडून संकलन केले जात आहे. खाजगी संस्था शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी दर देत आहेत. यामुळे जिल्हा दूध संघाचा गाडा परत एकदा चालू व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीबाबत मंत्री सावे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान सावे यांनी दोन्ही पक्षांना लेखी म्हणणे सादर करण्याची सूचना दिली आहे. संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सहनिबंधकांनी रद्द ठरवला होता. याला संस्थेने आव्हान दिले आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघ आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. संघ परत एकदा सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- रणजितसिंह शिंदे, अध्यक्ष, दूध पंढरी