

Solapur Abhishek Birajdar Heart attack
सोलापूर : सोलापूर शहरात डीजेच्या तालावर नाचताना अभिषेक बिराजदार या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तर या घटनेमुळे सोलापुरातील कर्णकर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अभिषेक बिराजदार हा सोलापूरमधील रहिवासी असून एका खासगी कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत होता. डान्स करत असताना तो अतिशय उत्साहात दिसत होता, याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काही वेळ नाचल्यानंतर अभिषेक अचानक बाजूला गेला आणि क्षणातच जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अभिषेकच्या कुटुंबीयांसह मित्रमंडळींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तर डीजेच्या आवाजावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.