

करमाळा : समोरासमोर झालेल्या मोटार सायकल अपघातातील पतीच्या निधनानंतर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दि.11 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुंभेज फाटा ते कुंभेज रस्त्यावर कुकडी कॅनॉलजवळ हा अपघात घडला होता.
कालिंदा मोहन कादगे (वय 40, रा. कुंभेज) असे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या पत्नीचेचे नाव आहे.मोहन भागवत कादगे (वय 50, रा कुंभेज ता. करमाळा) यांचा अपघातानंतर 12 मे रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. मोहन भागवत कादगे व त्यांची पत्नी कालींदा हे दुचाकी वरून शेतातून गावाकडे परतत होते. समोरून येणार्या सचिन शिंदे यांच्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली होती. यामध्ये मोहन कादगे व कालींदा कादगे हे दोघे तसेच सचिन साहेबराव शिंदे (वय 32 रा. कुंभेज) असे तिघेही गंभीर जखमी झाले होते.यामधील कादगे पती-पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर सचिन शिंदे याच्यावर उपचार सुरू आहेत. मोहन व कालिंदा कादगे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य भागवत कादगे यांचे ते दोघेही मुलगा व सून होत.त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.