

Prostitution racket Solapur Vite
करमाळा : वीट येथे अवैधरित्या चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा टाकून करमाळा पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या एकास अटक केली असून तीन मुलींची सुटका केली आहे. त्यांना न्यायालयाच्या आदेशाने सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
संतोष रोहीदास जगदाळे (वय ४१) रा. वीट, ता. करमाळा असे अटक केलेल्या कुंटणखाना चालवणाऱ्या चालकाचे नाव आहे. त्याला बार्शी सत्र न्यायालयाने बुधवारपर्यंत (७ मे ) पोलीस कोठडी ठोठावली आहे. याची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्याचे महेश हंबीराव डोंगरे यांनी करमाळा पोलीसात दिली आहे.
करमाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना गोपणीय माहिती मिळाली होती की, मौजे विट गावचे शिवारात एक व्यक्ती अवैध कुंटणखाना चालवित आहे. त्यामुळे रणजीत माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपटराव टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिनगारे आदी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले.
यावेळी करमाळा पोलीस ठाणे वीट हद्दीमधील हॉटेल साईलीलाच्या पाठीमागे पाझर तलावाजवळच्या ठिकाणी एक व्यक्ती काही महिलांना डांबुन त्यांच्याकडुन अनाधिकृतपणे जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत आहे अशीही माहिती मिळाली. याची शहानिशा करताना त्या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवुन पंचांसमक्ष छापा टाकला.
साईलीला हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या खोलीमध्ये जावुन छापा टाकून कारवाई करुन तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची सुटका केली. त्यांनी हे व्यक्ती महिलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. प्रत्येक गिऱ्हाईकामागे त्यास ५००/- रुपये मिळतात असेही त्याने सांगितले. त्यामुळे संशयित आरोपी संतोष रोहीदास जगदाळे (वय ४१) वर्षे रा. वीट, ता. करमाळा याच्यावर वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित आरोपी संतोष जगदाळे याला बार्शी सत्र न्यायालयाने ०७ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. तसेच पिडीत मुलींना बार्शी येथे हजर करून त्यांना रेणुका माता शासकीय महिला आश्रम होटगी रोड, सोलापूर येथे सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली हवालदार अजित उबाळे, मनिष पवार, वैभव ठेंगल, तौफिक काझी, ज्ञानेश्वर घोगडे, सोमनाथ जगताप, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे, योगेश येवले, रविराज गटकुळ, अमोल रंदील, शितल नाव्हकर यांनी केली आहे. या गुन्हयाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक रणजीत माने हे करीत आहेत.