मंगळवेढा : उमदी येथून खवे (ता. मंगळवेढा) या ठिकाणी दुचाकीवरून येत असताना सोड्डी फाट्याजवळ एका अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेसह लहान मुलीचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २५) दुपारी पावणेचार वाजता घडली. यात शांता धनाजी बाबर (वय २७, रा. काळेवाडी, ता. मोहोळ) व अनन्या धनाजी बाबर (वय ५) या मायलेकींचा अपघातात मृत्यू झाला.
शांता हिचे वडील गणपत धोंडिबा भोसले (रा. खवे) हे दुचाकी क्रमांक (एम. एच. १३ बी. ई. ३३११) वरून उमदी याठिकाणी आपले काम आटोपून गाडीवर असलेली त्यांची मुलगी शांता व नात अनन्या हिला घेऊन खवे गावाकडे येत होते. सोड्डी फाटीजवळ मंगळवेढा-उमदी रस्त्यावर अवजड वाहन क्रमांक (टि. एन. ४७ए. एफ. ६९९१) जात असताना धडक होऊन वाहनस्वार गणपत भोसले हे दुचाकीवरून पडले. यावेळी त्यांची मुलगी व नातही खाली पडली. त्यावेळी अवजड वाहन त्यांच्या अंगावरुन गेल्याने मायलेकी जागेवर मयत झाल्या. मृतदेहाचे जागेवरच छिन्नविच्छिन्न तुकडे झाल्याने सलगर प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले वैद्यकीय अधिकारी अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.