

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर टोप कासारवाडी फाट्यावर ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने टोप दक्षिणवाडी येथील वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी (दि. १७) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यत्तीचे नाव सर्जेराव पांडुरंग गायकवाड (वय ६०, रा. टोप दक्षिणवाडी) असे आहे. ते आपल्या दुचाकीने (क्र. एम एच १० बी एफ ८१४१) टोप येथून कासारवाडीकडे जात होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना पुण्याहून बंगळुरुच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (क्र. डी डी ०३ टी ९३६६) गायकवाड यांच्या गाडीस पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये गायकवाड हे हायवेच्या मध्यभागी पडल्याने त्यांच्या डोक्यास जोराचा मार लागला. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात करण्यात आली.
सर्जेराव गायकवाड हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले होते. त्यांनी नुकतेच नवीन घर बांधून त्याची काही दिवसापूर्वीच वास्तुशांती केली होती. मंगळवारी (दि. १८) ते या घरात गृहप्रवेश करून राहण्यास जाणार होते मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनेपरिसरात हळहळ व्यक्त होत आहे.