

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी करणारा संजय भीमाशंकर थोबडे यांचा अर्ज पुणे विभागाचे सह. आयुक्त राहुल मामू यांनी फेटाळला.
ट्रस्टचे नियमन करताना विश्वस्तांच्या हातून घडलेल्या काही कृती या ट्रस्टचे जाणीवपूर्वक नुकसान करणार्या तसेच विश्वस्तांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी हेतुपूर्वक केल्या नसतील. तत्कालीन परिस्थितीनुसार ट्रस्टच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी काही निर्णय घ्यावे लागले असतील, तर त्यासाठी विश्वस्त मंडळ बरखास्तीसारख्या टोकाच्या निर्णयाची आवश्यकता नाही. सुधारात्मक उपाय करण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे, अशी मार्गदर्शक तत्वे या निकालामध्ये अधोरेखित केली आहेत.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी ही धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह सुमारे पस्तीस विश्वस्त कार्यरत आहेत. त्यांच्या बरखास्तीचा अर्ज फेटाळण्यात आला. त्याचबरोबर या विश्वस्त मंडळातील नेमणुकांबद्दलचे सर्व बदल अर्ज एक वर्षाच्या आत निकाली काढण्याचे आदेश सोलापूरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले. या आदेशामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निरीक्षक नियुक्त करून दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
गेल्या सुमारे पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाने श्री सिद्धेश्वर मंदिरात अनेक सुधारणा केल्या. या कालावधीत प्रसंगानुसार ट्रस्टच्या उद्दिष्टपूर्ती तसेच भाविकांच्या सोयीसाठी काही तातडीचे निर्णय घेऊन काम करावे लागले. ही कामे करत असताना त्यास आवश्यक असलेल्या परवानगी देताना महानगरपालिकेने दंड आकारला म्हणून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. वास्तविक पाहता या कालावधीमध्ये अर्जदार संजय थोबडे हेसुद्धा एक विश्वस्त होते. या सर्व घडामोडींची माहिती त्यांनाही होतीच. त्यावेळेस त्यांनी कोणतीही हरकत घेतली नव्हती. परंतु काही कारणास्तव संजय थोबडे यांच्या वैयक्तिक मागणीवरून अध्यक्ष काडादी आणि इतर विश्वस्तांसोबत वादंग झाले. थोबडेंनी ट्रस्टच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. त्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा देण्याची संधी दिली होती. मात्र त्यांनी परत विश्वस्त मंडळ सभेमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे 18 जून 2018 रोजी झालेल्या बैठकीमध्ये संजय थोबडे यांना विश्वस्त पदावरून काढण्यात आले.
विश्वस्त म्हणून त्यांचे नाव कमी करण्याचा बदल अहवाल सोलापूर धर्मादाय कार्यालयात दाखल झाल्यावर त्याची प्रतिक्रिया म्हणून थोबडे यांनी लगेचच सर्व विश्वस्त मंडळ बरखास्तीसाठी पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयाकडे अर्ज केला होता. धर्मादाय सहआयुक्त राहुल मामू यांनी थोबडेंच्या अर्जातील सर्व मुद्यांवर दाखल कागद पत्रांचे आधारे सविस्तर सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकून घेतला. ट्रस्टच्या मिळकतीमधून विश्वस्त मंडळाने स्वतःला लाभ व्हावा, असा कोणताही हेतुपूर्वक निर्णय घेतला नसल्याचा आणि ट्रस्ट मिळकतींचे नुकसान झाले नसल्याचा निष्कर्ष काढून थोबडे यांचा अर्ज पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयाने फेटाळला. यामध्ये सिद्धेश्वर देवस्थान आणि विश्वस्तांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांच्यासह अॅड. विश्वनाथ आळंगे, अॅड. किरण कनाळे, अॅड. माधुरी थोरात व अॅड. श्रद्धा मोरे यांनी काम पाहिले.