सोलापूर : हजारोंच्या उपस्थितीत रंगला श्रीफळ हंडी सोहळा
मोडनिंब : ज्ञानोबा, तुकारामचा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या गजरात, तोफांची सलामी देत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यातील श्रीफळ फोडण्याचा कार्यक्रम अपार उत्साहात अरण (ता. माढा) येथे पार पडला. महाराष्ट्रातील अशी एकमेवाद्वितीय श्रीफळ हंडी सोहळा पाहण्यासाठी सावता महाराज मंदिर परिसर भाविकांमुळे फुलून गेला होता.
सावता महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र अरण येथे 729 व्या पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात आठवडाभरापासून सुरू आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली. श्रीफळ हंडी फोडण्याचा मान हा देहूकर यांच्या घराण्याकडे आहे. श्रीफळ हंडी यात्रेतील कार्यक्रमात पंढरपूरहून पांडुरंग पालखीची उपस्थिती, संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळा, श्रीफळ हंडी फोडणे, नाम संकीर्तन सप्ताहाचा शेवट, तसेच पांडुरंग पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान हे सर्व कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने साजरे केले जातात. या सर्व यात्रेतील श्रीफळ हंडी फोडणे हा उत्सव अत्यंत नयनरम्य असतो.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो भक्त भाविक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवतात. आज रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान सुरू झाला. सुमारे पाऊण तास श्रीफळ हंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. मोठ्या भक्तिमय वातावरणात हा सोहळा अपार उत्साहात झाला. हजारो भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा श्रीफळ हंडी सोहळा शूटिंग करून घेतला.
श्रीफळ हंडीतील नारळ प्रसाद म्हणून घेण्यासाठी तरुणाईने मोठी धडपड केली. पंढरपूरहून आलेली पांडुरंगाची पालखी आणि संत शिरोमणी सावता महाराजांची पालखी या दोन्ही पालख्यासमोर काल्याचे कीर्तन सुरू असताना श्रीफळ हंडी फोडण्यात आली.
हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी श्री संत सावता महाराज मंदिर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे, बंडू घाडगे यांचे निवासस्थान, हनुमान मंदिर तसेच ग्रामस्थांच्या घरासमोर नागरिकांनी गर्दी करत सोहळा पाहण्याचा आनंद घेतला. गेल्या आठवड्याभरापासून अरणमध्ये सावता महाराजांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. पंढरपूरहून आलेल्या विठुरायाच्या पालखीच्या दर्शनालाही भाविक सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हजेरी लावत आहेत.