

सोलापूर : सध्या भाजपमध्ये निष्ठावंत विरुध्द आयाराम यांच्यात शीतयुध्द सुरू झाल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या राजकीय पटलावर उमटत आहे. एकीकडे आ. देवेंद्र कोठे यांनी भाजप स्वबळावर लढावी, यासाठी आग्रही असल्याचे वृत्त असतानाच आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांच्या समर्थक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीत डावलण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने बंडाची भाषा केली आहे. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.
भाजपतील अनेक निष्ठावंतांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिंदेसेनेत जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजप-शिंदे सेना यांच्यातील महायुती धोक्यात येण्याची शक्यता असून, शिंदेसेनेने स्वबळाची तयारी केली आहे. आ. देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या गटातील 15 जणांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपकडे केल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पेटला आहे. दोन्ही देशमुखांनी निष्ठावंत कार्यकर्ते अन्य पक्षात जाऊन उभे राहिल्यास त्यांना बळ देऊ, अशी भूमिका जाहीर केल्याने भाजपमधील नाराजांचा फायदा शिंदेसेना उचलण्याच्या तयारीत आहे. सोलापुरातील महायुतीसंदर्भात दोन बैठका झाल्या असून, अजून निर्णय अंतिम झालेला नाही.
वरिष्ठांच्या निर्णयावरच गणित
दोन्ही देशमुखांनी निष्ठावंतांसोबत उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी रात्री मुंबईत देशमुखांना वगळून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासोबत बैठक आयोजिली. आता पक्षाचे वरिष्ठ नेते हे दोन्ही देशमुखांना बाजूला सारुन निवडणूक लढवतील की, समजूत काढून सोबत घेतील यावर भाजपचे यश, अपयश अवलंबून राहणार आहे. त्याचा निर्णय रविवारी (दि. 28) सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता सुत्रांनी सांगितले.
उमेदवारी यादी उद्या जाहीरची शक्यता
शिंदेसेनेने सुरुवातीला 50 जागांची मागणी केली होती. त्यानंतर आता 30 जागांचा प्रस्ताव तयार केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारनंतर दोनच दिवस राहणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारी यादीकडे शिंदेसेना लक्ष ठेवून आहे. भाजपमधील ज्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळणार नाही, अशा नाराज नेत्यांच्या हाती धनुष्यबाण देण्याच्या गुप्त हालचाली सुरू केल्या आहेत.