

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे ईव्हीएम विरोधात आवाज उठवल्याने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे देशातील केंद्रबिंदू ठरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातीलच पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राज्यातील पहिला ईव्हीएम समर्थणार्थ ठराव बहुमताने पारित करून देशाचे लक्ष वेधले आहे.
गुरुवारी (दि.१२) पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत सदस्यांसमोर ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला 17 सदस्यांपैकी 14 सदस्यांनी उपस्थित राहून ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत हात उंचावून सहमती दर्शवल्याने हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक खंडागळे यांनी दिली.