

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा: बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना एकच्या सुमारास बार्शी - लातूर रोडवर पांगरी जवळ एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याचे त्यांना आढळले. हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः चारचाकी गाडीच्या पलट्या झाल्या होत्या. या अपघातामध्ये चारचाकी मधील एक युवक जखमी अवस्थेमध्ये गाडीमध्येच अडकलेला होता.
गस्तीसाठी निघालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तत्काळ गाडी थांबवून अपघातग्रस्त चारचाकी मधील युवकाला स्वतः बाहेर काढून सहकाऱ्यांच्या मदतीने पांगरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल केले. जखमी युवकाचे नाव अजय पांचाळ असून, तो धाराशिव जिल्ह्यातील सांजा येथील रहिवाशी असल्याचे समजले.
याप्रसंगी दिलीप ढेरे यांनी जखमीचा मोबाईल घेऊन घडलेला प्रकार त्याच्या नातेवाईकांना सांगितला. दिलीप ढेरे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यामध्ये अतिशय चोखपणे बंदोबस्त राबविल्याबद्दल, त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या कार्य तत्परतेमुळे एका युवकाचे प्राण वाचले आहेत.