

सोलापूर : अक्कलकोट पंचायत समितीच्या कृषी विभागातील विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे हे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या वादात बळी ठरल्याची चर्चा होत आहे. याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे दुर्लक्ष होत असल्याचीही चर्चा आहे.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित कदम यांनी विस्तार अधिकारी म्हेत्रे यांचे निलंबन केल्याने त्यामध्ये मोठे राजकारण झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगू लागली आहे. म्हेत्रे हे करमाळा येथे विस्तार अधिकारी म्हणून काम करत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील समाजकल्याण येथे विस्तार अधिकारी नसल्याने त्यांना तेथे कामासाठी घेतले होते. मात्र, ते करमाळा येथे गैरहजर असल्याने गटविकास अधिकारी कदम यांनी त्यांना थेट निलंबित केले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर मोठा दबाव असल्याची चर्चा होत आहे.
जिल्ह्यातील विविध पंचायत समिती येथे नियुक्ती असलेले अनेक अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषदेत येथे कामकाज करत आहेत. मात्र, एकट्या विस्तार अधिकारी म्हेत्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही कारवाई सूडबुद्धीने केल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत होत आहे.
विविध पंचायत समिती येथे नियुक्ती असलेल्या अनेक अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काम करत आहेत. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर केव्हा कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
समाजकल्याण विभागात विस्तार अधिकारी म्हेत्रे यांनी चांगले काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहात त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले असून, त्यांची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेकडून करण्यात येणार आहे. तसे निवेदन देण्यात येणार आहे.
- अरुण क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी संघ