सोलापूर : शेतीच्या वादातून खून; चौघांना जन्मठेप

सोलापूर : शेतीच्या वादातून खून; चौघांना जन्मठेप
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा : शेत जमिनीच्या वादातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अधिकारी मल्लिकार्जुन धोंडाप्पा दिंडोरे (वय 52) याचा गोळ्या घालून खून केला होता. याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 2 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ही रक्‍कम मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी हा निकाल दिला. 

बप्पू उर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे (वय 34), बसवराज महादेव दिंडोरे (65), सिध्दाराम उर्फ सिद्राम महादेव दिंडोरे (54), शिवानंद महादेव दिंडोरे (62, सर्व रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, आहेरवाडी येथील फताटेवाडी मार्गे जाणार्‍या रोडवर दिंडोरे वस्ती मृत मल्लिकार्जुन भाऊ व फिर्यादी मधुकर धोंडाप्पा दिंडोरे, आई, बहिण भागिरथी सह कुटुंबियांसमवेत राहत होता. त्याच्या शेजारीच सर्व भावकीतील आरोपी राहतात.

मल्लिकार्जुन व त्याची बहीण भागिरथी यांच्यात शेतजमीन वाटणीवरून वाद सुरू होता. त्याची संबंधित आरोपींनाही माहिती होती. त्यात त्यांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु हा वाद मल्लिकार्जुन व भागितथी यांनी आपसात मिटवून घेतला. याची माहिती संबंधित आरोपींना दिली नव्हती. हे समजताच संबंधित आरोपी चिडून होते.

दरम्यान, मल्लिकार्जुन हा त्याच्या वस्तीवर 19 मार्च 2017 रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास सर्व कुटुंबियांसमवेत बसला होता. त्यावेळी फिर्यादी दिंडोरे यांच्या भावकीतील बप्पू दिंडोरे सह चौघे आले. त्यांनी जमिनीचा वाद आम्हाला न सांगता कसा मिटविला याबद्दल जाब विचारला. यातून वाद विकोपाला गेला. याच कारणावरून बप्पू दिंडोरे याने मल्लिकार्जुनसह सर्वांना 'आत्ता तुम्हाला खल्लास करतो' असे म्हणून बंदूक उगारली. यावेळी बप्पू याने बाराबोअरच्या बंदुकीतून मल्लिकार्जून दिंडोरे याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या मल्लिकार्जून यांच्या डोक्यात, गळ्यावर, कपाळावर, पोटात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी मधुकर व भागिरथी मात्र हल्ल्यातून बचावले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. गोळीबाराद्वारे खुनाच्या या प्रकाराने गावात एकच दहशत निर्माण झाली होती. गंभीर जखमी झालेल्या मल्लिाकार्जून दिंडोरे यांना नातेवाईकांनी तत्काळ अश्‍विनी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान 21 मार्च 2017 रोजी मल्लिकार्जून दिंडोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत मल्लिकार्जून दिडोरे यांच्या भावाने वळसंग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून बप्पू दिंडोरे सह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास वळसंग पोलिसांनी करून चौघांना अटक केली होती. या आरोपींविरूध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला अतिरिक्त सत्र न्याायाधीश पांढरे यांच्यासमोर चालला. याप्रकरणी 14 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीशांनी दोन्ही बाजुंच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून बप्पू दिंडोरे सह चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. व 8 लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या खटल्यात सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग रजपूत यांनी काम पाहिले.

आरोपी बप्पू दिंडोरेवर अनेक गुन्हे दाखल
आरोपी बप्पू दिंडोरे याच्याविरूध्द यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी हे रात्री कारखान्यातून आपल्या कारमधून घरी येत होते. त्यावेळी बप्पू दिंडोरे याने पावसात काडादी यांच्या कारवर गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणात त्याच्याविरूध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गोळीबार प्र्र्रकरणात पोलिसांनी आरोपी बप्पू दिंडोरे याला अटक केली होती. या गोळीबार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आरोपी बप्पू दिंडोरे याने मल्लिकार्जून दिंडोरे यांचा गोळ्या घालून खून केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news