

सोलापूर : महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पुढे ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात महापालिकेकडून करवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि.15) बोलावण्यात आली आहे. या सभेपुढे भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली संदर्भातील विषयासह इतर चार विषयही मान्यतेसाठी पाठविले. मात्र या भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीच्या माध्यमातून भविष्यात शहरातील मिळकतदारांना कर आणि दरवाढीचा फटका बसणार असल्याची ओरड पुन्हा एकदा सुरू झाली असून अशा स्थितीत स्थायी समितीमध्ये या प्रस्तावावर कोणता निर्णय होणार याकडे मात्र साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
सोलापूर शहराचा वाढता विस्तार आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले विकास प्रकल्प पाहता, महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत अधिक बळकट आणि पारदर्शक करणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात महापालिका प्रशासनाने नमूद केले आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रात सध्या भाडे मूल्यावर आधारित कर प्रणाली मालमत्तेच्या प्रत्यक्ष बाजारभावाशी सुसंगत नाही. त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली स्वीकारण्याचा हा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.