

सोलापूर : निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना अजूनही कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. महायुतीची घोषणा खोळंबली असून महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले नाही. यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होणे लांबले असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सुट्ट्या वगळता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस राहिले आहेत. तरीही सोलापुरात कोणत्याच पक्षातने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र राज्य पातळीवर 29 महापालिकेसाठी भाजप सेनायुतीची बोलणी सुरू आहे. त्यामुळे
सोलापुरातील दोन्ही पक्षातील नेते अजूनही वेटिंगवर आहेत. युती न झाल्यास दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपमधील बंडखोर आणि तगडे उमेदवार गळाला लावण्यासाठी शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची उमेदवारी यादी लांबली आहे.भाजपमधून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या आहे त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी भाजपा शेवटच्या दिवशी उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे किंवा थेट शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठकावर बैठका सुरू आहेत. मात्र यामधून कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना या तीन पक्षांबरोबरच माकपा, मनसे आणि समाजवादी पार्टी महाविकास आघाडीत सामील आहे. या सर्व पक्षांनी मागणी केलेल्या जागांची संख्या दीडशे पेक्षा जास्त आहे. त्यामुळे कुणाला किती जागा द्यायच्या याची चाचपणी सध्या सुरू आहे. प्रत्येक प्रभाग निहाय कोणाची किती ताकद आहे याचा आढावा घेतला जात आहे. त्याला वेळ लागत असल्याने उमेदवारी यादी लांबली आहे. त्याचबरोबर भाजप शिवसेनेतील काही बंडखोर नेत्यांना महाविकास आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची उमेदवारी यादी रखडली आहे. महाविकास आघाडीत कोणत्या जागा कोणत्या पक्षासाठी सूटेबल आहेत त्याची यादी तयार असून त्या जागांवर उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने देखील उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी रविवारचा दिवस निवडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही तगडे उमेदवार गळाला लागतात का याची चाचणी राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. इतर छोट्या पक्षांनी मात्र कोणत्या जागा लढवायच्या यावर शिक्कामोर्तब केले असले तरी उमेदवारी जाहीर केलेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचीही उमेदवारी यादी लांबली असून महायुती बंडखोरी टाळण्यासाठी तर महाविकास आघाडी जागा वाटपात व्यस्त असल्याचे दिसते.
इच्छुकांचा अनेक पक्षांकडे डोळा
सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक तगड्या उमेदवारांना गळाला लावले आहे. त्यामुळे निष्ठावंत नाराज आहेत. एका प्रभागात 40 ते 50 इच्छुकांची संख्या आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने स्वतंत्र यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. यातील अनेक बंडखोर संभ्रमावस्थेत सापडले आहेत.