

सोलापूर : महापालिका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जीएसटी अनुदान आणि डीसीपीएस निधीची ३५ कोटी ५० लाखांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली. त्यामुळे इतके दिवस चर्चेत असलेला बंधन बँक की आयडीबीआय, या विषयावर पडदा पडला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, निधी गुंतवणूक आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित पाच विषयांना मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी - १८ कोटी रुपये, जीएसटी अनुदान - १० कोटी रुपये आणि डीसीपीएस निधी ७ कोटी ५० लाख रुपये असे एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदतठेवीत गुंतविण्यास मंजुरी दिली.
मुदतठेवीसाठी महापालिकेने संकेतस्थळावर जाहीर प्रसिद्धी देऊन राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांकडून ई-मेलद्वारे व्याजदर मागविले होते. प्राप्त दरपत्रकांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेने वार्षिक ७.२० टक्के इतका सर्वाधिक व्याजदर दिला. त्यामुळे ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम या बँकेत मुदतठेवीत ठेवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.