सोलापूर : संचालकांचा दूध संघाच्या उत्कर्षापेक्षा संपत्तीवरच डोळा

सोलापूर : संचालकांचा दूध संघाच्या उत्कर्षापेक्षा संपत्तीवरच डोळा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रशासकानंतर जिल्हा दूध संघात सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाकडून जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठ्या आशा होत्या. मात्र संचालक मंडळाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे संघाच्या डोईवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. संघ कमकुवत होईल तसतसा जिल्ह्यातील खासगी संस्थांचा दबाव वाढत चालला आहे.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या जिल्हा संघाला सद्य:स्थितीतून काढणे हे मोठे दिव्य होते. मात्र हे शिवधनुष्य पेलणार, अशी घोषणा विद्यमान संचालक मंडळाने सत्तेत आल्यानंतर केली होती. संघाचे विद्यमान अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांचे वडील आमदार बबनराव शिंदे यांनीही जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाचा कारभार पाहिला होता. त्यांच्या कारकिर्दीतच जिल्हा दूध संघाने मोठा लौकिक कमावला. यामुळे साहजिकच रणजितसिंह शिंदे यांच्याकडून जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठ्या आशा होत्या. मात्र गेल्या वर्षभरातील संचालक मंडळाचा कारभार पाहता, जिल्ह्यातील दूध उत्पादकांची साफ निराशा झाली आहे.

संचालक मंडळातील काही सदस्यांचा हेतू शुद्ध नसून, संघातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवण्याची त्यांची दररोजची धडपड दूध उत्पादकांसमोरुन लपून राहिली नाही. काही संचालक गुणवत्ताहीन दूध पुरवठा करुन लाभ मिळवत आहेत. काही संचालकांच्या गाड्या संघात दूध व दुग्धजन्य पदार्थ वाहतुकीसाठी भाड्याने लावल्या आहेत. अपवाद वगळता संचालक मंडळातील सदस्यांना दूध संघाचे पुनर्जीवन करण्याऐवजी लोण्याचा गोळा खाण्यातच जास्त रस आहे. संचालक मंडळाने संघाचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली टेंभुर्णी येथे व्यापारीसंकुल उभे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी टेंभुर्णी येथील व्यापार्‍यांकडून डिपॉझिटपोटी रक्कमही गोळा केली. याबदल्यात त्यांना 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर राष्ट्रीय महामार्गालगत असलेली किंमती जमीन उपलब्ध करून देण्यात आली. यातून संघाचे किती भले होणार होते, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र अध्यक्षांच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची आयुष्यभरासाठी सोय होणार आहे. मात्र संचालक मंडळाच्या निर्णयाला उपनिबंधक कार्यालयाने मंजुरी दिली नाही. टेंभुर्णी येथे व्यापारी संकुल उभे करणे हे संघाच्या तोट्याचे असल्याचे नमूद करत हे काम बंद करावे, असे निर्देश उपनिबंधक महेश कदम यांनी दिले होते. मात्र अद्याप काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

उरल्यासुरल्या मालमत्तेची विल्हेवाट

संघाचे कर्ज फेडण्यासाठी मुंबई येथील जागा विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातही बाजारमूल्याच्या अर्ध्या किमतीपेक्षाही कमी किमतीत जागा विकण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. आता ही जागा विक्री करण्याची जबाबदारी एका स्वीकृत संचालकाला दिली असल्याची चर्चा आहे. मुंबई येथील जागेचे भाव आणि संचालक मंडळाने निर्धारित केलेली किंमत यात मोठी तफावत असल्याचा दावा केला जात आहे. हे एकूण सर्व प्रकार पाहता दूध संघाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याऐवजी दूध संघाच्या उरल्यासुरल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news