

सोलापूर : ऐन पावसाळ्यात चारा मुबलक असताना उत्पादन वाढल्याने दुधाला दर कमी मिळताे. यंदा मात्र याकाळातही दुधाचे भाव प्रति लिटर ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे भेसळीच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचा दावा केला जात आहे. परिणामी म्हशीच्या दुधास प्रति लिटर ६० रुपये तर गायीच्या दुधास ५० रुपये दर मिळत आहे.
दरवषी जुलै ते जानेवारीपर्यंत दुधांचा सुकाळ असतो. चाराही मुबलक असल्याने या कालावधीत दुधाचे दर उन्हाळापेक्षा कमी असतो. परंतु, सोलापूर जिल्ह्यात दूध संकलनात होणाऱ्या अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे कृत्रिम आणि भेसळयुक्त दूध विक्रीवर जरब बसली आहे.
दूध संकलनात घट झाल्याने मागणी वाढली
दैनंदिन दूध संकलनात घट होत आहे. इतर जिल्ह्यात १५ ते २० टक्के घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना दुधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे सणासुदीच्या काळात दूध पावडर, पेढा, खवा यांची मागणी वाढल्याने खासगी संघांनी खरेदी दर वाढवले आहेत.
यामुळे वाढले दर
मागील वर्षीत पावसाळा आणि हिवाळ्यात सोलापूर जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादन ही १७ ते १८ लाख लिटर प्रतिदिन होते. यंदा त्यात सुमारे २ ते ३ लाख लिटरने घट झाली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. दुग्धविकास विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार एकूण दैनंदिन उत्पादन १५ लाख लिटर असून, सहकारी संस्थांमार्फत २ ते ३ लाख लिटर, खासगी दूध संघ, डेअरी मार्फत १२ ते १३ लाख लिटर संकलन होते.