एकाच झाडावरील तोतापुरी, हापूस, दसेरी, कंदीपेढा, केसरची चाखा चव; मार्डीच्या युवकाचा प्रयोग

एकाच झाडावरील तोतापुरी, हापूस, दसेरी, कंदीपेढा, केसरची चाखा चव; मार्डीच्या युवकाचा प्रयोग
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  नावीन्य आणि प्रयोगाला सध्या चांगले दिवस आहेत. नवनवीन संकल्पना पुढे आणत प्रयोगशील राहणारेच या युगामध्ये सरस ठरत आहेत. असाच एकवेगळा प्रयोग मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील बी.एस्सी. अ‍ॅग्री. करणार्‍या युवकाने आपल्या शेतात करून जगासमोर नवीन आदर्श ठेवला आहे. स्वतःच्या आंब्याच्या बागेमध्ये एकाच आंब्याच्या बुंध्यावर हापूस, तोतापुरी, दसेरी, कंदीपेढा, अन् केसर, बारमाई या सहा वाणांचे कलम करुन या वाणांचे तो उत्पादन घेत आहे. ते आंबे आज बाजारात विकण्यात येत आहेत.

लखन रामलिंग फसके (वय 24) असे त्या तरुण प्रयोगशील शेतकर्‍याचे नाव आहे. वडिलोपार्जित शेतीत सुरुवातीला त्याने प्रयोग म्हणून पहिला प्रयत्न केला आहे. यात त्याला चांगले यश मिळाले आणि त्याची आशा वृद्धिंगत झाली, उत्साह वाढला. लखन फसके हे वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात अ‍ॅग्री. डिप्लोमा पूर्ण केला असून आता बी. एस्सी. अ‍ॅग्रीचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रयोगशीलतेला श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या सचिवा डॉ. अनिता ढोबळे, प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांचे प्रोत्साहन मिळत आहे. त्यांच्या या कामात वडील रामलिंग, आई अलका, भाऊ नारायण, बहीण विश्रांती, आजी सुरवंटा यांची मदत मिळत असल्याने त्याचा उत्साह वाढत आहे.

फणस, जांभूळ यासह भाजीपाला, कांदा, ज्वारी, गहू ही पारंपरिक पिकेही ते त्यांच्या शेतात घेतात. पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन, शेळी, ससे पालन, विदेशी कुत्र्यांचे संगोपनही ते करत आहेत. नोकरी करण्यासाठी नव्हे, तर शेती विकसित करण्याबरोबरच इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते शिक्षण घेत आहेत.

नर्सरीत बहुप्रकारच्या आंब्यांची रोपे उपलब्ध

लखन फसके यांच्या नर्सरीला शासनाने मान्यता दिली असून या नर्सरीत हापूस, केसर, तोतापुरी, दसेरी, कंदीपेढा, बारामाई आंब्याची रोपे उपलब्ध करून देत आहेत. रोपे तयार झाल्यानंतर त्यांची शेंडे मारून सहा प्रकारचे डोळे भरण्यात येतात. यामुळे एकाच झाडावर वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचे उत्पादन घेता येणार आहे आणि त्याची चवही चाखता येणार आहे. बारामाई आंब्याबरोबरच नष्ट होत असलेल्या कंदीपेढा जातीचे संगोपन करण्याचाही त्यांनी चंग बांधून त्याच्या विकासासाठी ते प्रयत्न करत आहेत.

कल्पकता व प्रयोगशीलतेवर लखन फसके हे जगासमोर आपले कौशल्य मांडत आहेत. याच बळावर ते भविष्यात एक प्रयोगशील शेतकरी आणि कृषी क्षेत्रात लौकिक मिळविणार आहेत. आमच्या संस्थेचे ते विद्यार्थी आहेत, याचा अभिमान आहे.
– डॉ. अनिता ढोबळे सचिव, श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news