

सोलापूर ः एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 15 हजार 475 मुली लखपती होणार आहेत. राज्य शासनाच्या लेक लाडकी योजनेतून जिल्ह्यातील हजारो मुली भविष्यात लखपती होणार असून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार असल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, बालिकांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे या योजनेचा मुख्य उद्देश असून, त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाणार असून मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणात सातत्य राहण्यास मदत होणार असून, बालविवाहाला आळा बसण्यासही हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
असा मिळणार लाभ
लेक लाडकी योजने अंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुलींचा जन्म झाला आह, अशा मुलांनी लेक लाडकी योजनेसाठी अर्ज केल्यास प्रारंभी पाच हजार रूपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रूपये, सहावीत गेल्यावर सात हजार रूपये, अकरावीत आठ हजार रूपये, तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रूपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रक्कम देण्यात येणार आहे.