

Solapur Karmala rainfall
करमाळा : करमाळा तालुक्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दोन तलाव फुटल्याने सीना नदीला महापूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आष्टी तालुक्यातील दोन तलाव फुटल्याने सीना नदीला महापूर
नदीकाठच्या गावात शेतीचे प्रचंड नुकसान, घरात पाणी शिरले
करमाळा तालुक्यातील 9 हजार हेक्टर शेती पाण्याखाली, 12 हजार शेतकरी बाधित
11 गावे पूरग्रस्त, नऊ गावांचा संपर्क तुटला
शेकडो लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
महसूल प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, काहींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. जीवितहानी टळली असली तरी अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांताधिकारी, पालकमंत्री तसेच जनप्रतिनिधी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सीना नदीकाठच्या सुमारे 8 ते 10 गावांमध्ये बिकट परिस्थिती असून संगोबा, आलजापूर, खडकी, तरटगाव, मिरगव्हाण, निलज या गावांमध्ये शेतजमिनी व घरांना मोठे नुकसान झाले आहे. पूरपाण्याने बंधारे, कठडे वाहून गेले असून पिके पाण्याखाली गेली आहेत.
तालुक्यातील कोर्टी परिसरातही अतिवृष्टी झाली असून ओढ्याला आलेल्या पुरामुळे घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले. ग्रामपंचायत व पोस्टाचे कार्यालय यासह इतर ठिकाणी पाणी शिरल्याने प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील सुमारे 9 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 12 हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. 11 गावे बाधित झाली असून नऊ गावांचा संपर्क तुटलेला आहे. शेकडो लोकांना स्थलांतरित करून त्यांची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, नदीचे पाणी ओसरत असले तरी हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पिकांचे पंचनामे काही ठिकाणी सुरू झाले असून पाणी ओसरल्यानंतर उर्वरित ठिकाणी पंचनामे करण्यात येणार आहेत.