

Karmala Veet Road car bike collision
करमाळा: करमाळा तालुक्यातील वीट गावाजवळील भुजबळ वस्तीजवळ आज (दि.४) दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास करमाळा–वीट रस्त्यावर घडला.
या दुर्घटनेत हनुमंत केरू फलफले (वय ३५), कांचन हनुमंत फलफले (वय ३१, दोघेही रा. अंजनडोह, ता. करमाळा) आणि स्वाती शरद काशीद (वय २५, रा. सराफवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
तर राजू विनोद धोत्रे (१९), जयश्री विनोद धोत्रे (४५), भारत पंजाबी (६५), राहुल विनोद धोत्रे (२३), विनोद धोत्रे (५०), इशान सोनी (१९ सर्व रा. गोखलेनगर, पुणे) आणि अपर्णा दत्तात्रय होले (२५) आणि कार्तिक दत्तात्रय होले (वय ३, दोघे रा. होलेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे आठजण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भीषण होता की कार (क्र. MH 04 EF 1001) मोटारसायकलला (क्र. 45 U 3805) धडकल्यानंतर तीन–चार वेळा पलटी मारत रस्त्याच्या खाली कोसळली. मोटारसायकलवरील तिघे जागीच उडून आपटल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमींना उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून गंभीर अवस्थेतील बालकाला पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कार ही पुण्यावरून करमाळा तालुक्यातील भालेवाडी येथे जात होती. तर मृत हनुमंत फलफले आपल्या बहिणीला दसऱ्याच्या यात्रेनंतर कपडे खरेदी करून परत अंजनडोहकडे घेऊन जात होता. या दुर्दैवी अपघातात भावासह त्याची पत्नी व बहिणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.