

सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुमारे तीन वर्षांपूर्वीच्या घरफोडीतील १० लाख ९६ हजार रुपये किमतीचे ९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या प्रकरणी शोएब रमजान शेख (वय २६, रा. मुमताजनगर, सोलापूर) यास अटक केली आहे.
मुमताजनगर येथील एका घरातून २७ जानेवारी २०२४ रोजी ९६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे यांना सूचना केली होती. त्यानुसार तपासात मोरे यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा फिर्यादीच्या घराशेजारी राहणाऱ्या शोएब रमजान शेख याने केला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने २३ सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले १० लाख ९६ हजार रुपये किमतीचे ९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून उघडकीस न आलेला घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाद्वारे उघडकीस आणला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे, बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, युवराज गायकवाड, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, सतीश काटे यांनी पार पाडली.