

चिखलठाण : पुढारी वृत्तसेवा : जेऊर (ता. करमाळा) येथील पोस्ट ऑफिसला भीषण आग लागल्याने सर्व कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले. ही घटना आज (दि.१०) दुपारी तीनच्या सुमारास घडली. आज ऑफिसला सुट्टी असल्याने अचानक लागलेल्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. (Solapur Fire News)
गावाच्या मध्यभागी रेल्वे स्टेशनच्या जवळ पोस्ट ऑफिस आहे. जुन्या पद्धतीच्या इमारतीमध्ये असलेल्या या पोस्ट ऑफिसला आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने धुराचे लोट आकाशात दिसू लागले. आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला संपर्क केला. करमाळा येथून नगर परिषदेचे अग्निशमन बंब येईपर्यंत आतील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आज सुट्टी असल्यामुळे या परिसरात लोकांची वर्दळ नसल्याने आग लागल्याचे लवकर लक्षात आले नाही. ऑफिसमधील रोख रक्कम महत्त्वाची कागदपत्रे यासह कपाट, कॉम्प्युटर्स व इतर ऑफिसियल साहित्य जळून खाक झाले आहे.