

पोखरापूर : जुन्या भांडणाच्या रागातून पती-पत्नीवर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. 8) दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान रोपळे ते येवती (ता. मोहोळ) रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकावर रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवती येथील शिवाजी पुंडलिक जाधव (वय 65) व त्यांच्या पत्नी सुरेखा असे दोघे मिळून पंढरपूर येथे चैत्रीवारीनिमित्त दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रोपळे मार्गे दुचाकीवरून येवतीकडे येत असताना, त्यांच्याच गावातील दशरथ केरू गायकवाड याने जुन्या भांडणाच्या रागातून पिस्तुलातून जाधव पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गायकवाड याने केलेल्या राऊंड फायरमध्ये सुरेखा जाधव या गंभीर जखमी झाल्या. तसेच शिवाजी जाधव हे पण जखमी झाले. घटनेनंतर तत्काळ ग्रामस्थांनी त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
घटनास्थळावरूनच स्थानिक लोकांनी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना तत्काळ फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक शेडगे हे घटनास्थळी टीमसह पोहचले. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत फायर झालेले व फायर न झालेले राऊंड मॅक्झिन जप्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आदींनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या.
घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा, ठसे तज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेनंतर संशयित आरोपी दशरथ गायकवाड फरार झाला आहे. त्याच्या तपासासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिसांकडून सुरू आहे.