

Solapur Hyderabad highway Car Accident
उमरगा : देवदर्शन करून गावाकडे कारने परत निघालेल्या चौघांवर काळाने घाला घातला. दाट धुक्यात भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटून दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी, (दि २१) सकाळी साडे सातच्या सुमारास सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाळींब (ता. उमरगा) शिवारात घडली. अपघातातील मृत हे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दीपावली सणानिमित्त कर्नाटकातील भाविक सोमवारी (के ए ३८ एम ९९४६) या कारने सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील महालिंगराया देवस्थानच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून गावाकडे परतत होते. यावेळी आज सकाळी दाळिंब व शिवाजी नगर तांडा (ता. उमरगा) दरम्यान एका पेट्रोल पंपाजवळील लहान वळणावर दाट धुक्यात सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा सफारी (एम एच १४ इ पी ०७३२) चालकाचा ताबा सुटला. भरधाव कार महामार्गावरील दुभाजकाला जोरात धडकून हवेत उडाली, आणि दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या भाविकांच्या गाडीवर आदळली.
यात कार महामार्गालगच्या खड्डयात फेकली गेली. यात रतिकांत मारूती बसगौडा (वय ३०), शिवकुमार चितानंद वग्गे (वय २६), संतोष बजरंग बसगौडा (वय २०), सदानंद मारूती बसगौडा (वय १९, चौघेही रा. खाशमपुर (पी) ता. जि. बिदर) हे भाविक जागीच ठार झाले. तर कार चालक दिगंबर जगन्नाथ संगोळगी (वय ३१, रा. खाशमपुर (पी) जि. बिदर) व सफारी चालक लावण्य हणमंत मसूती (वय २२, रा सोलापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले.
यातील चारही मृतदेह उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर जखमी दोन्ही चालकांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर व बिदर येथे पाठविण्यात आले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यासाठी दाळिंबचे सरपंच प्रशांत देवकते, बाबा जाफरी, शिवाजी जाधव आदींसह ग्रामस्थांनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहीफळे, पोलीस उपनिरीक्षक डी. डी. गव्हाणे, सहायक पोलीस फौजदार संजीवन शिंदे, नागनाथ वाघमारे आदीसह पोलीस उपस्थित होते.
तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील या वर्षात झालेल्या अपघाताच्या घटना पैकी दाळींब शिवारातील भिषण अपघाताची सर्वात मोठी घटना आहे. एखाद्या अँक्शनपट चित्रपटातील द्रश्याप्रमाणे भरधाव सफारी कार दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या ग्रॅन्ड विटारा कारवर आदळली, यात विटारा कार अक्षरशः चेंदामेंदा होवून हवेत घिरट्या घालीत महामार्गाच्या बाजूच्या खड्यात फेकली गेली. तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी अपघातग्रस्त कार मधील जखमींना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.