

Solapur Pune Highway bus hits bike
मोडनिंब : सोलापूर–पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ आज (दि. २१) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. आकुंभे गावाकडे जाण्यासाठी दुचाकी (क्र. MH 29 CE 6823) घेऊन रस्ता ओलांडताना चालकाने समोरून येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष केले. यामुळे अक्कलकोटहून पुण्याकडे जाणाऱ्या एस.टी. बस (क्र. MH 07 C 9240) ने दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शंकर धावजी लडके (वय २४) असून, गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव पुष्पा धावजी लडके (वय २२) असे आहे. दोघेही मूळचे रा. विटाळा, ता. डिग्रज, जि. यवतमाळ येथील असून सध्या आकुंभे येथे ऊसतोडीसाठी वास्तव्यास आहेत.
या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि उजव्या पायाला जबर मार लागल्याने त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेली महिला डोक्याला व हाताला गंभीर दुखापत होऊन ती गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका सेवेद्वारे डॉ. महेंद्र ताकतोडे व चालक श्री. मगंद भोसले यांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक, रुग्णवाहिका पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी साळुंखे त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला, तसेच एस.टी. बस दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरली. या बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले.