

Husband kills Wife Solapur South taluka
सोलापूर : अवघ्या काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला. त्यानंतर दोघांत खटेक उडायला सुरुवात झाली. त्यातून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. आणि स्वतः गळफास घेऊन जीवन संपविले. सोलापूर दक्षिण तालुक्यातील उळे येथे रविवारी (दि.६) रात्री ही धक्कादायक घटना घडली. गोपाळ लक्ष्मण गुंड (वय 30) गायत्री गोपाळ गुंड (वय 22 दोघे रा. मुक्काम पोस्ट उळे, तालुका दक्षिण सोलापूर) अशी पती पत्नीची नावे आहेत.
आषाढी एकादशी असल्याने रविवारी (दि.6) रात्री घरातील सर्वजण भजनाला गेले होते. भजनाहून परतल्यानंतर त्यांना हॉलमध्ये गायत्री ही फरशीवर पडलेली आढळली. तिच्या गळ्याभोवती मोबाईल चार्जरची वायर गुंडाळलेली होती. दुसर्या खोलीत गोपाळ नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला कळवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवले.
गोपाळ हा दूध व्यवसाय करीत होता. त्यातूनच सोलापुरात गायत्रीच्या घरी दूध देताना त्यांचे प्रेम जुळले. दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्यांचे घरच्यांनी लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतर त्यांच्यात कुरबुर सुरू झाली. त्यानंतर प्राथमिक माहिती नुसार रविवारी गोपाळ गुंड यांने गायत्रीचा चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला व त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत जीवन संपविल्याची चर्चा आहे. या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.