

सोलापूर : सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागातील बदली झालेले काही मोटार वाहन निरीक्षक सोलापूर सोडून इतर ठिकाणी जाण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. बदली होऊन दीड महिना होत आला तरी त्यांना सोलापुरातील खुर्ची सोडवेना झाली आहे. त्यांना पदमुक्त केल्याचे आरटीओ अधिकारी सांगत आहेत. परंतु त्यांचे वास्तव्य मात्र सोलापूर कार्यालयातच आहे.
मे महिन्यात राज्यातील ‘आरटीओ’ कार्यालयांंतर्गत काम करणार्या 159 वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. सोलापूर आरटीओमधील संदीप शिंदे, शिवाजी सोनटक्के, सचिंद्रकुमार राठोर, पल्लवी पांडव, प्रदीप बनसोडे, किरण गोंधळे, शीतलकुमार कुंभार, अविनाश आंभोरे व शिरीष पवार या नऊ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या जागी साधना कवळे, विशाल यादव, संतोष झगडे, निलेश देशमुख, गणेश तपकिरे, राजन सरदेसाई, धनंजय थोरे यांची नियुक्ती झाली. परंतु या बदल्या होऊन दीड महिना लोटला तरी यातील काही मोटार वाहन निरीक्षकांना सोलापूरचा मोह सोडवत नसल्याचे दिसत आहे. मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे, शीतलकुमार कुंभार आणि प्रदीप बनसोडे हे तीन मोटार वाहन निरीक्षक अद्यापही सोलापूर कार्यालयात दिसत आहेत. या तीनही अधिकार्यांची दुसर्या जिल्ह्यात बदली झाली आहे. परंतु त्यांना सोलापूर सोडवेना झाले आहे.
दीड महिन्यांपासून ते सोलापुरात ठाण मांडून आहेत. या मोटार वाहन निरीक्षकांना पदमुक्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. मग हे अधिकारी दीड महिन्यांपासून सोलापूर आरटीओ कार्यालयात करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. अधिकार्यांना बदलीचा आदेश मान्य नसेल तर मॅटमध्ये जाण्याचा अधिकार आहे. मॅटच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा त्याच जागी नियुक्ती मिळू शकते. परंतु यासाठी थांबण्याची त्यांची तयारी नाही. त्यांना सोलापूरची खुर्ची सोडवेना झाल्याचे दिसत आहे.