

अमोल साळुंके
सोलापूर ः अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 90 स्मशानभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. स्मशानभूमी दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने शासनाकडे पाठविला आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदीकाठच्या स्मशानभूमीचे अतोनात नुकसान झाले असून, यासाठी दोन कोटींपेक्षा जास्त निधीची गरज आहे. मात्र, हा निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. शासनाकडून निधी आल्यानंतरच स्मशानभूमीचे दुरुस्तीचे कामे होणार आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पुरामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीसह शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालयाने, समाज मंदिरे, पाणीपुरवठ्याच्या योजनेचे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे झेडपीने शासनाकडे शाळा, अंगणवाडी, समाज मंदिरासह इतर शासकीय इमारतीच्या नुकसानाची माहिती शासनाकडे पाठविली असून, शासनाच्या निधीनंतर या कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.