Solapur News : नगराध्यक्षसह सदस्यांना एकच चिन्ह द्या

अन्यथा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा इशारा
Solapur News
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून चिन्ह वाटप करताना दुजाभाव केला जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी दुसरे चिन्ह न देता पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना नगराध्यक्ष व नगरसेवकांना एकच चिन्ह द्या, अशी मागणी करुनही चिन्ह देत नसाल आणि चिन्ह देताना दुजाभाव करत असाल तर ही संविधानाची पायमल्ली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुजाभाव न करताना निवडणूक चिन्ह पॅनलला एकसारखे द्यावे. अन्यथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात आजपासून ठिय्या आंदोलनाला बसू, असा इशारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांना दिला आहे.

यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते नागेश भोसले, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, साईनाथ भाऊ अभंगराव, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके, नगरसेवक पदाचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे आदींसह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

भगीरथ भालके म्हणाले की, निवडणूक निर्णय अधिकारी हे जाणूनबुजून एकाला एक आणि दुसऱ्याला एक अशा प्रकारचा निर्णय देत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सातत्याने अनेक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. या अगोदरच्या निवडणुकांचा विचार करता उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर लगेचच चिन्ह वाटप करण्यात येते.मात्र, या निवडणुकीत पाच दिवसानंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येत आहे. जेणेकरुन इतर उमेदवारांना प्रचार करण्यास कमी वेळ मिळावा, असेच नियोजन केल्याचा संशय येत आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार कार्यक्रम ठरल्यानुसार चिन्ह वाटप होणार आहे. चिन्ह वाटप झाल्यानंतरच प्रचाराला सुरुवात करता येणार आहे. असे असताना भाजपने कमळ चिन्हाचा वापर करुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची वाट न पाहता प्रचाराचा शुभारंभ लगेचच केला. शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत नाही. नेतेमंडळींचे वाढदिवसांचे फलक तसेच झळकत आहेत. आचारसंहिता कक्ष का कारवाई करत नाही, असा सवालही भालके यांनी उपस्थित केला. भालके पुढे म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही नोंदणीकृत आहे. मागील वेळेस 33 टक्के सदस्य निवडून आले आहेत. आघाडीकडून उमेदवारांना एबी फॉर्म जोडलेले आहेत. अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे या आघाडीतील उमेदवार सदस्यांची अपक्ष म्हणून आपण गणना करु नका. नियमांची अंमलबजावणी करा. एकाला एक आणि दुसऱ्यास एक, असा नियम लावू नका. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना रिक्षा हे एकच चिन्ह वाटप करा किंवा अन्य कोणतेही चिन्ह वाटप करा, मात्र एकच चिन्ह द्या, अन्यथा आज बुधवार, दि. 26 पासून आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार आणि नागरिकांना घेऊन नगरपरिषदेच्या पायऱ्यांवर दि. 2 डिसेंबरपर्यंत ठिय्या मांडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो द्या. गुन्हे दाखल करायचे असतील तर करा, असे म्हणत पंढरपूरकरांना चिन्ह वाटपाप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नागेश भोसले, किरण घाडगे, डॉ. प्रणिता भालके यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपच्या दबावाला बळी न पडता सर्वांना समान न्याय देण्याची मागणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात झालेली गर्दी, गोंधळ पाहून शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विश्वजित घोडके व पोलिस पथक दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news