

सोलापूर : सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रशासनाला दिल्या. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला होता. राष्ट्रीय हातमाग दिनी ही आनंदाची बातमी आल्याने विणकर बांधवांत उत्साह संचारला आहे.
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून पैठणी, हिमरू, करवतकाठी, विदर्भ घोंगडी, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील खण फॅब्रिक यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सोलापुरी सिल्क साडी या उत्कृष्ट पारंपरिक वारशाला शासनाच्या अधिकृत पारंपरिक वस्त्रोद्योग यादीत हक्काचे स्थान मिळालेले नाही.
या धोरणात सोलापूर सिल्क साडीचा पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून समावेश करून हातमाग कामगारांना सवलती व आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
आ. देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. राष्ट्रीय हातमाग दिनी ही बातमी आल्याने सोलापुरातील विणकर बांधवांनी जल्लोष केला.