

सोलापूर : श्रावण महिना आणि पाठोपाठ येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरेसह गूळ, शेंगदाणे, खाद्यतेल आणि नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
जुलै अखेरीस ५३ रुपये किलो असलेली साखर आता ६८ ते ७० रुपयांवर पोहोचली आहे. शेंगदाणे ११५ वरून १२५ रुपये, खाद्यतेल १६५ वरून १७५ रुपये आणि गूळ ५५ वरून ७० रुपये किलो झाला आहे. श्रावणातील मागणी वाढल्याने नारळाचे दरही ३० वरून थेट ५० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे.
साखरेच्या दरात अवघ्या महिनाभरात किलोमागे सुमारे १७ ते १९ रुपयांची वाढ झाली आहे. साखर कारखान्यांकडून उसापासून साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिल्याने साखरेच्या उत्पादनात यंदा सुमारे पाच टक्क्यांची घट झाली आहे. उत्पादन घटल्याने बाजारात साखरेचा पुरवठा आणि दरावर परिणाम झाला आहे.सन २०२१ मध्ये सोलापुरात ३४ ते ३७ रुपये किलो असलेली साखर आता ७० रुपयांवर पोहोचली आहे. पाच वर्षांत साखरेच्या दरात किलोमागे २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
गुळाचाही किरकोळ दर ६४ ते ६८ रुपये किलोवर गेला आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साखरेवर स्टॉक लिमिट लागू केली आहे. चहाचे दर वाढण्याची शक्यताही समोर आली आहे. श्रावण महिन्यात उपवास, धार्मिक कार्यक्रम आणि सणांमुळे चहाचे सेवन वाढते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होत असल्याने या काळात साखरेची मागणीही वाढते.
साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम चहाच्या रोजच्या खर्चावर होत आहे. साखरेचे दर असेच वाढत राहिल्यास चहाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडू शकतो. एकूणच साखर महागली की त्यावर आधारीत पदार्थांचे दरही वाढणार हे निश्चित.