Solapur flyover: उड्डाणपुलासाठी दोन महिन्यांत निघणार निविदा; मुख्यमंत्र्यांची सूचना

पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक : विमानसेवा बंदप्रकरणी कंपन्यांना नोटिसा देणार
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavispudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : पुरेशी दृष्यमानता असताना सोलापूर ते मुंबई, गोवा ही विमानसेवा सुरू राहिलीच पाहिजे. त्यासाठी संबंधित कंपन्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानसेवा प्राधिकरणाला दिले. तसेच शहरातील प्रलंबित उड्डाण पुलासंदर्भात दोन महिन्यांत निविदा निघेल, याबाबत संबंधितांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापुरातील उड्डाण पूल, बंद पडलेली विमानसेवा, विमानांचे नाईट लँडिंग, शहरास दररोज पाणीपुरवठा या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) मुंबईत बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री गोरे, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत काय करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली असून लवकरच तोही विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

उड्डाण पुलाविषयीचे सर्व अडथळे दूर

जुना पुणा नाका ते पत्रकार भवन आणि बोरामणी नाका ते पत्रकार भवन अशा दोन्ही उड्डाण पुलांसाठी राज्य शासनाच्या मालकीच्या जागा विनामूल्य मिळणार आहेत, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील दूर संचार निगम, सरंक्षण विभाग, पोस्ट विभाग, रेल्वे विभागाच्या जागांचे भूसंपादन करण्यात येईल. त्यासाठी संबंधित विभागासोबत बैठका झाल्या आहेत. त्यामुळे उड्डाण पुलाविषयीचे सर्व अडथळे दूर झाले असून, दोन महिन्यांत प्रत्यक्षात काम सुरू होण्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तशा सूचना संबंधित केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

आयटी पार्क होटगीतच... आठवड्यात जागा हस्तांतर

नियोजित आयटी पार्क होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जलसंपदा विभागाच्या जागेवरच होईल. आठवडाभरात जलसंपदा विभागांकडून त्यांची जागा महसूल आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. सोलापूरच्या प्रलंबित आयटी पार्क आणि दररोज पाणीपुरवठा यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. त्यानंतर गोरे यांनी ही माहिती दिली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापूर दौऱ्यात आयटी पार्क होटगीत नव्हे, तर शहरातच व्हावा, असा मुद्दा मांडला होता. त्यामुळे संभ्रमावस्था पसरली होती; मात्र आता पालकमंत्र्यांनी याविषयी सुस्पष्ट शब्दांत निर्वाळा दिला आहे. आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची ५० एकर जागा पूर्णतः मोफत दिली जाणार आहे. ती जागा लवकरच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news