

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या वाटप यादीत सोलापूर जिल्ह्यातील 11 हजार 394 शेतकर्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकर्यांसाठी 128 कोटी 10 लाख 44 हजार 161 रुपये इतकी रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा करून त्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.
शासनाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या जिल्हानिहाय पहिल्या वाटपाच्या आकडेवारीत सोलापूर जिल्ह्याचा अंतर्भाव आहे. या कर्जमुक्तीच्या रकमेत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2 हजार 529 शेतकर्यांचा समावेश आहे. या शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी 25 कोटी 32 लाख 80 हजार 629 रुपये इतकी रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित शेतकर्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये पहिल्या वाटपात 1 लाख 4 हजार 61 शेतकरी लाभार्थी ठरले असून त्यांच्यासाठी एकूण 860 कोटी 96 लाख 73 हजार 58 रुपये इतकी रक्कम आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील 11,394 शेतकर्यांच्या खात्यात 128 कोटी 10 लाख 44 हजार 161 रुपये जमा करण्यात आले आहेत. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत नाव आलेल्या शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, उर्वरित पात्र शेतकर्यांचा पुढील यादीत समावेश कधी होणार, याकडे आता जिल्ह्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील 26 हजार 253 पात्र लाभार्थ्यांपैकी शुक्रवारी सायंकाळपर्यंत 19 हजार 731 शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण झाले आहे. अजूनही 6 हजार 366 शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही. आधार प्रमाणीकरण केले तरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरण केले नाही तर शेतकर्यांना कर्जमुक्तीचा लाभापासून वंचित राहावे लागेल. तेव्हा शेतकर्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक पवार यांनी केले आहे.