

सांगली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील २१ हजार ७२५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १५६.५४ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (सांगली) तसेच संबंधित अधिकारी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७२६ लाभार्थ्यांच्या खात्यावर १३२.८५ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या १ हजार ९९९ लाभार्थ्यांच्या खात्यावर २३.६९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ६८ हजार ९८१ पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ५६ हजार ९६२, तर राष्ट्रीयीकृत बँकांची १२ हजार १९ कर्जखाती आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील ३८ हजार ४१० पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. त्यापैकी ३१ हजार ९४४ पात्र लाभार्थ्यांची प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.