Solapur Jewellery Market : दिवाळीत ३० कोटींची सोने-चांदी खरेदी; सराफ बाजारात तेजी

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याच्या परंपरेला सोलापूरकरांचा यंदाही मोठा प्रतिसाद
Solapur Jewellery Market : दिवाळीत ३० कोटींची सोने-चांदी खरेदी; सराफ बाजारात तेजी
Published on: 
Updated on: 

सोलापूर : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याच्या परंपरेला सोलापूरकरांनी यंदाही मोठा प्रतिसाद दिला. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान शहरात सुमारे ३० कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीची खरेदी झाली. सोलापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष गिरीश देवरमनी यांनी ही माहिती दिली.

धनत्रयोदशीला सोने, चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असते. यंदाही सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. सोन्याचे दागिने, चांदीची नाणी, लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती तसेच विविध वस्तू खरेदी करण्याला ग्राहकांनी पसंती दिली. शहरात सुमारे ३५० लहान-मोठे सराफ व्यावसायिक असून त्यांच्या दुकानांमध्ये दिवाळीच्या काळात चांगली उलाढाल झाल्याचे देवरमनी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, यंदा सोने-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. दिवाळीपूर्वी दरात घसरण झाल्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा तेजी आली आहे. बुधवारी (दि.११) २४ कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे ९६८ रुपयांनी वाढून १ लाख ४२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर किलोमागे ३ हजार १३२ रुपयांनी वाढून १ लाख ८६ हजार रुपयांवर गेला आहे. दरातील चढ-उतार असतानाही सोलापूरकरांनी दिवाळीच्या मुहूर्तावर केलेली खरेदी सराफ बाजारासाठी समाधानकारक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सोलापूरच्या सराफ बाजारात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा विशेष कल होता. यंदा शहरात सुमारे ३० कोटी रुपयांपर्यंत सोने-चांदीची खरेदी झाली आहे.
- गिरीश देवरमनी, अध्यक्ष, सोलापूर सराफ व्यापारी संघ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.