

मोहोळ : तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे अवैधरित्या विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून १ लाख ५८० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई गुरुवार (दि. २५ जून) रोजी करण्यात आली असून या प्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी सिकंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात संकेत संतोष सोनटक्के (वय २२, रा. शामनगर, सिकंदर टाकळी) हा आपल्या घराशेजारील पत्राशेडमध्ये अवैधरीत्या विदेशी दारूची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती गोपनी मार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या पाच बॉक्स (किंमत ५२,५८० रुपये) आणि रॉयल स्टॅग कंपनीचे चार बॉक्स (किंमत ४८,००० रुपये) असा एकूण १ लाख ५८० रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान संकेत सोनटक्के याने हा दारूचा साठा स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर (रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.