

सोलापूर : शहरातील 26 प्रभागांमध्ये महापालिकेची निवडणूक होत असून प्रभाग 22 मध्ये सर्वाधिक 36 उमेदवार तर सर्वांत कमी उमेदवार प्रभाग दोनमध्ये आहेत. बहुतांश प्रभागांत बहुरंगी आणि पंचरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. काही निवडक प्रभागांमध्ये केवळ दोन उमेदवार आमने- सामने असल्याने तेथे थेट व प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे.
उमेदवारांच्या संख्येच्या बाबतीत प्रभाग क्रमांक 26 आघाडीवर असून येथे सर्वाधिक 36 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या प्रभागात मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता व्यक केली जात आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक 17 मध्ये 34, प्रभाग 1 मध्ये 30 उमेदवार, प्रभाग 5, 6, 14, 23 मध्ये प्रत्येकी 27 उमेदवार आहेत. प्रभाग 29 मध्ये 25 उमेदवार आहेत. तर सर्वात कमी उमेदवार प्रभाग 2 मध्ये आहेत. 12 उमेदवार आखड्यात आहेत. त्यानंतर इतर प्रभागामध्ये 15 पासून 20 पर्यंत उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात आहेत. बहुतेक प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असून, पक्षीय उमेदवारांसोबतच स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले अनेक चेहरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काही प्रभागांमध्ये पारंपरिक राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच गदारोळात काही प्रभागांत चित्र वेगळे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 7 ड मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी अमोल शिंदे (एकनाथ शिंदे गट ) आणि पद्माकर काळे (भाजप) हे केवळ दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात असून, येथे थेट आणि अटीतटीची लढत होणार आहे. या प्रभागात दोन्ही उमेदवारांचे वैयक्तिक संपर्क आणि मागील निवडणुकांचा अनुभव महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांना एकनाथ शिंदे गटाचे निर्मला पासकंटी यांच्यात थेट सामना होत आहे. येथे कोणताही तिसरा उमेदवार नसल्याने ही लढत अधिक लक्षवेधी ठरणार आहे. प्रभाग क्रमांक 3 (क) मध्ये भाजपचे उमेदवार रंजीता चाकोते यांना काँग्रेसच्या राजाबाई पंगोडगाळ यांनी थेट आव्हान दिले असून, येथेही दोनच उमेदवार मैदानात आहेत. याच धर्तीवर प्रभाग क्रमांक2 ब मध्ये मध्ये देखील थेट लढतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाच्या कल्पना कारभारी यांना मनसेच्या नवख्या उमेदवार संध्या भोसले यांनी आव्हाने दिले आहे. दोन उमेदवार निवडणूक आखड्यात आहेत. प्रभाग 2 अ मध्ये तीन उमेदवार आमने सामने आहेत. भाजपचे उमेदवार माजी नगरसेवकप्रा. नारायण बनसोडे यांना उबाठा सेनेचे प्रशांत कावळे, अजित पवार गटाचे निलेश व्हटकर यांनी आव्हान दिले आहे. एकूणच, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काही प्रभागांत उमेदवारांची मोठी गर्दी असल्याने मतांचे विभाजन निर्णायक ठरणार असताना, काही प्रभागांत थेट लढतीमुळे निकाल अधिक स्पष्ट आणि चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात बहुरंगी लढत प्रभावी ठरणार आणि कोणत्या प्रभागात थेट लढतीत बाजी कोण मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.